गडचिरोली, प्रतिनिधी :-
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत 6 लाख रुपयांचा अवैध दारू साठा व चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी फरार आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 21 जून 2026 रोजी देसाईगंज पोलिसांनी ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी–देसाईगंज मार्गावरील वैनगंगा नदी परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी एमएच-20 बीसी-8161 क्रमांकाचे सिल्व्हर रंगाचे मारुती सुझुकी रिट्झ वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला.
तपासणीदरम्यान वाहनातून संत्री कंपनीच्या 90 एमएल क्षमतेच्या 2,500 प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत सुमारे 2 लाख रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या रिट्झ कारची किंमत 4 लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वाहन चालकाने आपले नाव अमन अभिमन अलोने (वय 23, रा. मातावार्ड, देसाईगंज) असे सांगितले. चौकशीत त्याने हा दारू साठा आशिष नरेंद्र डाहाट (वय 37, रा. गांधीवार्ड, देसाईगंज) याचा असल्याची माहिती दिली.
या प्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अमन अलोने याच्यासह आशिष डाहाट याच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय जगताप यांच्या नेतृत्वात पार पडली.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कठोर पावले उचलत असून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button