गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर – Special Intensive Revision) अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय एसआयआर समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आगामी जनजागृती मोहीम आणि बूथस्तरीय नियोजनावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मतदार यादीतील पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत अभियानाची माहिती पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे म्हणाले, “मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून नागरिकांमध्ये एसआयआर अभियानाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी आणि एकही मतदार वंचित राहू नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा.”
बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक तथा गटनेते सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनीषा खेवले, मेघा वरघंटीवार, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, अहेरी तालुकाध्यक्ष पप्पू हकीम, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, ज्येष्ठ नेते निकेश गद्देवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाभरात एसआयआर अभियान प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून व्यापक जनजागृती आणि संघटनात्मक स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button