आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

मुख्यमंत्री पालक असलेल्या गडचिरोलीत रस्त्याची दुरवस्था

कांदोळी–भामरागड मार्गावर नागरिकांचे हाल

उदय धकाते गडचिरोली :-

राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील कांदोळी–भामरागड मार्गाची गेल्या चार-पाच दिवसांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून, चिखल आणि दलदलीतून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

एटापल्ली आणि भामरागड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून नागरिकांना शासकीय कामे, आरोग्यविषयक कारणे, शिक्षण तसेच इतर खासगी कामांसाठी नियमित ये-जा करावी लागते. मात्र, पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

या मार्गावरील परिस्थितीचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओमध्ये चिखलाने पूर्णपणे माखलेला रस्ता, त्यामध्ये अडकणारी वाहने आणि दुचाकीस्वारांची होत असलेली कसरत स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.

विशेष म्हणजे हा परिसर मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यक्षेत्रातील, तसेच अहेरी विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांकडे शासन, प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विकासाच्या घोषणा एकीकडे आणि प्रत्यक्षातील रस्त्यांची अवस्था दुसरीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या भागातील नागरिकांना रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

प्रशासनाने कांदोळी–भामरागड मार्गाची तातडीने पाहणी करून चिखलमय झालेल्या रस्त्यावर आवश्यक मुरूम टाकून वाहतूक सुरळीत करावी, तसेच या मार्गाच्या कायमस्वरूपी मजबुतीकरणासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुख्यमंत्री पालक असलेल्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना अद्यापही चिखलातून वाट काढावी लागत असेल, तर ‘ग्रामीण विकास’ नेमका पोहोचला कुठे?, असा सवाल या परिस्थितीमुळे उपस्थित झाला आहे.

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker