गडचिरोली, प्रतिनिधी :-
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पात्र पदवीधरांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे युवा नेते सलील अनिल देशमुख यांनी केले. गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विदर्भ पदवीधर मतदारसंघात गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश असून, या मतदारसंघातून दर पाच वर्षांनी विधानपरिषदेवर एक प्रतिनिधी निवडला जातो. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडूनही मतदारसंघाची पूर्वतयारी सुरू असून, पदवीधर मतदारांची नोंदणी आणि मतदारसंघातील राजकीय परिस्थितीची चाचपणी केली जात असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले. ग्रामीण भागात अनेक चांगली कामे झाली असून, पदवीधर युवकांचे प्रश्न विधानपरिषदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी महाविकास आघाडी योग्य उमेदवार देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या प्रचारात सक्रिय भूमिका बजावेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यावे
अलीकडील युवकांच्या आंदोलनाचा संदर्भ देताना सलील देशमुख यांनी युवकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे सांगितले. पदवीधर आणि युवकांच्या शिक्षण, रोजगार तसेच भविष्यासंदर्भातील प्रश्नांना राजकीय पातळीवर प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्ह्यात शेतकरी वर्गावर अन्याय होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस कुठे दिसत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी आंदोलनात सक्रिय असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप होऊ नये, यासाठी पक्षाचे पदाधिकारी जाणीवपूर्वक पुढे येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेऊ नका
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत गण्यारपवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजबरीने घेऊ नयेत. या जमिनीवर वर्षातून दोन-तीन पिके घेतली जात असून त्यातून शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गडचिरोलीत लवकरच शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असून, या आंदोलनात कंपनीचे दलाल सहभागी होणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. यापूर्वी झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण नसल्याने पक्ष सहभागी झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अॅड. बोरकुटे, सरचिटणीस प्रवीण कुटे, महासचिव अविनाश गौतपत, प्रदेश सदस्य अॅड. संजय ठाकरे, विदर्भ प्रमुख शैलेश तिवारी, महिला अध्यक्ष संगीता राऊत, शेमदेव चाफले, संजय शृंगारपवार आदी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button