आपला जिल्हाताज्या घडामोडी

जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा- शिवसेना

आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत गंभीर असून, या घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचारी आणि संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गडचिरोली शाखेने केली आहे.

यासंदर्भात पक्षाच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंग यांना, प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित संस्थाचालकांसह आदिवासी विकास विभागाचीही असल्याने या घटनेत नेमकी चूक कुठे झाली, याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जपतलाई येथील घटनेमुळे मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्ह्यातील हजारो आदिवासी पालकांमध्ये आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छ परिसर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे या सुविधांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केवळ कागदोपत्री तपासणी नको

आश्रमशाळांची तपासणी केवळ कागदोपत्री न करता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील त्या तातडीने दूर करण्याबरोबरच निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व संस्थाचालकांची जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांचे सुरक्षा ऑडिट

जपतलाई घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे. आश्रमशाळांच्या परिसरातील झाडाझुडपांची नियमित साफसफाई, सर्पदंशासह इतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय आश्रमशाळांना मिळणाऱ्या शासकीय निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही, याची तपासणी करून गरज भासल्यास विशेष लेखापरीक्षण करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्या

मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यक शासकीय सहाय्य उपलब्ध करून द्यावे. तसेच चौकशीचा अहवाल पारदर्शकपणे कुटुंबीय व समाजासमोर मांडून दोषींवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव कोणत्याही प्रशासकीय हलगर्जीपणापेक्षा मोठा आहे. जपतलाईची घटना केवळ एक दुर्घटना म्हणून न पाहता, जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाला जागे करणारी गंभीर घटना म्हणून पाहिले पाहिजे. दोषींवर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना होईपर्यंत शिवसेना ठाकरे गट गप्प बसणार नाही,” असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker