आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ३६ जणांवर कारवाई

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी नांगपूर जंगल परिसरात सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत घटनास्थळावरून ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ३६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना १७ ऑगस्ट रोजी रात्री नांगपूर येथील जंगल परिसरात ताशांच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुल्हत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळावरून ३४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत व घटनास्थळावरून ४ लाख ४१ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
याशिवाय २३ चारचाकी वाहने, ५ दुचाकी वाहने, ताशांचे पत्ते, स्टीलची पेटी, बॅटरी व ताडपत्री असा एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या चौकशीत ताब्यात घेतलेल्या व्यक्तींनी परमेश्वर लोहंबरे (रा. नांगपूर) आणि मिथुन तांबेकर (रा. कोटगुल) यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी कोटगुल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ००८/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये एकूण ३६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक वायकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोटगुल पोलिसांच्या पथकाने केली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



