आपला जिल्हाताज्या घडामोडी
कोठी–कोरणार पुलिया प्रकरणी 19 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव; “जिल्हाधिकारी जवाब दो!”

गडचिरोली, :-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेली कोठी–कोरणार पुलिया 29 जुलै रोजी कोसळून 20 दिवस उलटले, तरीही संबंधित अधीक्षक अभियंता व कंत्राटदारावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. केवळ अधीक्षक अभियंत्यांचा अतिरिक्त पदभार काढून घेणे ही कारवाई नसून, या गंभीर प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे.
या प्रकरणी आजाद समाज पार्टीने 5 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित अधीक्षक अभियंता व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आता 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे घेराव व चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून “जिल्हाधिकारी जवाब दो!” अशी भूमिका घेत दोषी अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
तसेच, कोठी–कोरणार पुलियापुरते हे प्रकरण मर्यादित नसून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ₹550 कोटींच्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, या संपूर्ण कामांची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. देशातील नामांकित कंपन्यांनी निविदा भरलेल्या असताना काही विशिष्ट कंपन्यांना कामे देण्यात आल्याच्या प्रक्रियेचीही चौकशी करावी, अशी मागणी आहे.
हे आंदोलन आजाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आदिवासी विकास युवा परिषद आणि बिरसा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
“जनतेच्या पैशाचा हिशोब द्या; दोषींवर कारवाई करा. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



