आरोग्य व शिक्षण
विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-
शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आगामी काळात मुंबई मध्ये ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याची आणि प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांत ‘युथ अगेन्स्ट ड्रग्ज क्लब’ स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली.
मुंबई शहरातील शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियान राबविण्यासंदर्भात नियोजन आणि अनुषंगिक कार्यवाही संदर्भात आज मंत्री केसरकर यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, एटीएसचे महासंचालक परमजीत दहिया, मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त सुहास वारके, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त दा.रा. गहाणे, नशाबंदी मंडळाच्या राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास, अमोल मडामे, मोहम्मद इम्तियाज आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.




