आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वाचन संस्कृतीसाठी ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ अभिनव संकल्पना

          मोबाइलमुळे वाचन संस्कृती लुप्त होत असून यासाठी ग्रंथालय नावाची व्यवस्था ही अधिकाधिक आधुनिक केली पाहिजे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी पोस्टल लायब्ररी संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत ‘संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान’ द्वारा प्रायोजित आणि आयोजित वाचन संस्कृतीसाठी ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे.

          ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती’ या जिल्हा परिषदेच्या शतकोत्तर गौरवशाली शिक्षणाची परंपरा आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या शाळेतील इयत्ता पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी एक वाचनीय पुस्तक घरी दिले जाते. विद्यार्थी सदर पुस्तकाचे वाचन करून आपण वाचलेल्या पुस्तकावर प्रतिक्रिया लिहून पुस्तक पुढील शनिवारी परत करतात आणि परत नवीन पुस्तक घेऊन जातात.

          वाचलेल्या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी आणि सुविचार इत्यादी आपल्या ‘वाचन नोंदवही’ मध्ये लिहितात तसेच आपण वाचलेल्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, पुस्तकाची किंमत आणि प्रकाशनाची तारीख इत्यादी लिहून ठेवतात. काही निवडक विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांच्या मदतीने आपण वाचलेल्या पुस्तकावरचा अभिप्राय संबंधित लेखक आणि प्रकाशक यांना लेखी पत्र लिहून कळवतात.

          विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अवांतर वाचनासाठी निवडलेले पुस्तक आठ दिवस त्यांच्या घरी असते या कालावधीत त्यांचे आई – वडील, आजी – आजोबा, बहीण – भाऊ आणि त्यांचे मित्र मंडळी सदर पुस्तकाचे वाचन करतात. आज खर्‍या अर्थाने संपूर्ण कुटुंबंच्या कुटुंब वाचनाकडे वळत आहेत हा एक खूपच चांगला आणि सकारात्मक बदल ‘मौजे धरणगुत्ती’ या लहानशा गावात पहावयास मिळत आहे.

          ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ ही अभिनव संकल्पना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या सद् हेतूने संपूर्णपणे विनामूल्य राबवली जात आहे. पुस्तकांच्या वाचनासाठी कोणतेही प्रवेश शुल्क, किंवा मासिक शुल्क अथवा अनामत रक्कम घेतली जात नसून शालेय अभ्यासाबरोबरच मुलांना वाचनाचीही मेजवानी मिळावी या दृष्टीने सर्वच पातळीवर एकत्रितपणे प्रयत्न केले जात आहेत.

          ‘संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान’ यांच्या माध्यमातून कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, बालसाहित्य, नाटक – एकांकिका, सामान्यज्ञान, इतिहास, पर्यावरण, चरित्र – आत्मचरित्र, प्रवास वर्णन, अनुभवकथन, व्याकरण, शब्दकोश, आरोग्य, शेती विषयक, थोरांची माहिती, म्हणी, सुविचार, विज्ञान विषयक, मूल्यशिक्षण, व्यवसाय विषयक, व्यक्तिमत्त्व विकास आणि अन्य विविध विषयांवरील मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके मोफत उपलब्ध करण्यात आली. पुस्तकांची देवाण – घेवाण आणि सदर उपक्रमाचे उत्तम रीतीने संयोजन करण्यासाठी स्वयंसेवक विनामूल्य सेवा देत आहेत.     

          वाचनामुळे चांगल्या प्रकारे ज्ञान संपादित करता येत असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. ग्रंथालयाच्या उपक्रमामुळे समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. वाचकांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी आणि एकंदरीत समाज विकास होण्यासाठी ग्रंथालयाचेही योगदान महत्त्वाचे आहे.

          शाळांचा वार्षिक निकाल लागून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की, सुट्टीत काय – काय करायचे, याचे बेत अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा संपण्यापूर्वीच केलेले असतात. पूर्वी सुट्टी कधी सुरू व्हायची आणि कधी संपायची तेच कळत नव्हते अशा आठवणीत पालक नेहमीच रंगून जातात. तथापि सुट्टी लागायच्या अगोदरच अनेक पालकांना मुलांचे सुट्टीत काय करायचे हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. सुट्टी सुरू होताच समाज माध्यमावरील पालकांच्या समूहात तशी चर्चादेखील सुरू झाल्याचे आढळते. विद्यार्थी वर्षभर अभ्यासाचे आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहत असतात.

          किती पालक मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे भवितव्य ठरवायची परवानगी देतात? किंबहुना आपल्या अपूर्ण इच्छा मुलांनी पूर्ण कराव्यात अशीच बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते. महिना – दीड महिन्याच्या सुट्टीतही त्यांचे वेळापत्रक व्यस्त असावे आणि मुलांना कुठेतरी अडकवून टाकावे असे पालकांना का वाटते? सुट्टी मुलांच्या मनासारखी घालवू द्यायला, त्यांच्याही नकळत त्यांना जीवनकौशल्ये शिकवण्यासाठी सुट्टी उपयोगात आणता येते. मुले वाचत नाहीत ही बहुसंख्य पालकांची तक्रार असते.

          मुलांचे निसर्गाशी व पुस्तकांची मैत्री करून देण्यासाठी सुट्टीचा उपयोग करून घेता येऊ शकेल. वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. पुस्तकांमुळे मुलांना नवीन जगाची ओळख होते. आव्हाने स्वीकारून त्यांच्यावर मात करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक व्यवसायात वाचनाचा उपयोग होत असतो. उत्तम वाचन करणार्‍यांना सध्याच्या जगात चांगले दिवस आले आहेत. अन्न हे पोटाची भूक भागवते त्या पद्धतीने वाचन डोक्याची भूक भागवत असते. साक्षरतेकडून शहाणपणाकडचा प्रवास हा वाचनामुळेच संपन्न करता येतो. वाचन आपल्या जीवनात जाणिवा समृद्ध करीत असते. त्यामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमित वाचनाची सवय लावून घेणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

          वाचनाच्या माध्यमातून त्यांच्याचसारखी माणसे कष्टसाध्य यश कसे मिळवतात हे समजते. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, ‘वाचाल तर वाचाल’, ‘कष्टाविना फळ ना मिळते’ अशा अनेक म्हणींचे व्यावहारिक दाखले थोरा – मोठ्यांच्या आत्मचरित्रातून मिळू शकतात. व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण जडण – घडणीत पुस्तके फार महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक शाळेत वाचनाचा तास सक्तीचा केला गेला पाहिजे. वर्षभर पाठ्यपुस्तके हेच मुलांचे जग असते. सुट्टीत त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावता येऊ शकते. ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्टीत चालवलेल्या विशेष अभियानांतर्गत शेकडो मुला – मुलींनी विविध विषयांवरील पुस्तके वाचली आणि त्यातून ‘सुट्टीत वाचन संस्कृती रूजविण्यासाठी’ प्रयत्न केल्यास त्यांना भरघोस यश नक्कीच मिळते याचा प्रत्यय सदर उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी आलेला आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर जसे की, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी प्रचंड गर्दी करून अगदी पुस्तके मिळवण्यासाठी रांगा लावल्या. दुसरे असे की पुस्तकांची देवाण – घेवाण करण्याची वेळ सकाळी ९ – ते १० अशी असताना मुले सकाळी तयार होऊन सात वाजताच येत असत. हा अनुभव निश्चितच प्रेरणादायी असून मुले आवडीने वाचतात आणि मुलांना वाचायला आवडते हे अधोरेखित झालेले आहे; मात्र आम्ही पालक – शिक्षक आणि वडीलधार्‍या मंडळींनी मुलांना त्यासाठी प्रेरित करून योग्य त्या वातावरणाची निर्मिती करून द्यायला हवी. आज ‘मौजे धरणगुत्ती’ या गावातील विद्यार्थी आणि पालक यांची वाचनाची आवड लक्षात घेता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून खर्‍या अर्थाने ‘मौजे धरणगुत्ती’ या गावाची होत असलेली वाटचाल अभिमानास्पद असून वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी उचललेले पाऊल गावाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आहे. आपणही आपल्या परिसरात समाजाला उपयोगी असणारे उपक्रम राबवणे आवश्यक आहे.

          वाचनामुळे आयुष्यावर होणार्‍या संस्कारांची महती पटलेली अनेक माणसे आणि संस्था वाचन संस्कृतीच्या संवर्धंनासाठी झटतात. समाज माध्यमांवर एक रिक्षावाले प्रसिद्ध झाले आहेत. ते त्यांच्या रिक्षात छोटेसे वाचनालय चालवतात. प्रत्येक प्रवाशी रिक्षात कमीत कमी पंधरा मिनिटे तरी बसतो. या वेळेत त्यांनी पुस्तक चाळावे आणि जमले तर थोडेतरी वाचावे अशीच त्यांची अपेक्षा माफक असणार.

          एक उपक्रमशील आणि आदर्श शिक्षिका सौ. रोझमेरी राज धुदाट आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे अनुवादक राज धुदाट यांनी त्यांच्या ‘ग्रेस फॅमिली फेलोशिप, जयसिंगपूर’ या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत वाचनीय अशी शंभर पुस्तके ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ या अभिनव संकल्पनेच्या उपक्रमासाठी दान देऊन वचन चळवळीसाठी हातभार लावला आहे. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी सहकार्य देऊ केलेले आहे.

          मुलांना वाचनाचे वेड लावावे लागते. पुस्तकाचे एखादे पान फाटले तरी चालेल पण मुलांना पुस्तके हाताळू द्यावीत. पुस्तकांचा विशिष्ट सुगंध अनुभवू द्यावा अशी धारणा असणारे काही पालकही आढळतात. पण हातात पुस्तक घेऊन वाचले म्हणजेच वाचन केले ही व्याख्या काळाबरोबर बदलत आहे. अनेक मुले ऑनलाईन पुस्तके वाचू किंवा ऐकू लागली आहेत. मुलांना मोबाईलचे वेड असते. या वेडाचा वाचनासाठी सकारात्मक उपयोग पालकांना करून घेता येऊ शकेल. त्यामुळे मुलांच्या मनात पुस्तकांविषयी रुची आणि उत्सुकता निर्माण होऊ शकेल. त्यातून वाचनाकडे त्यांचा कलही वाढू शकेल. कोरोना काळात शाळा ऑनलाईन होत्या. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात सर्रास मोबाईल होते. ती त्यावेळची गरज असल्याने पालकांना बोलण्याची सोयच नव्हती. कोरोना संपला आणि शाळा पूर्वीसारख्याच ऑफलाईन सुरु झाल्या. तरीही अडीच-तीन वर्षांची सवय लागलेल्या मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणे पालकांपुढे अनेक समस्यांचे कारण बनले. काही पालकांनी जबरदस्तीने मोबाईल काढून घेताच अनेक मुलांनी सरळ आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे तर काही ठिकाणी मुले घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांपुढे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी मुलांना मोबाईल ही गरज होती. आता, त्याची गरजच नसताना मुलांचा हट्ट कसा पुरवायचा? व यातून मार्ग कसा काढायचा असा जटील प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच वाचनवेडे बनवण्यासाठी साप्ताहिक आणि उन्हाळ्याची सुट्टी उपयोगात आणता येईल.

‘ग्रंथालय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती या शतकोत्तर शैक्षणिक परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रंथालय / वाचनालय आपल्या दारी हा अभिनव उपक्रम शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धरणगुत्ती गावचे सुपुत्र डॉ. सुनील दादा पाटील यांची 30 ते 40 हजार पुस्तकांची लायब्ररी यासाठी सज्ज झाली आहे. डॉ. सुनील दादा पाटील यांच्या या वैयक्तिक लायब्ररीमधून प्रत्येक शनिवारी मुलांना आवडी – निवडीनुसार पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. पुस्तक वाचून झाल्यानंतर आपला अभिप्राय विद्यार्थी नोंद करणार आहेत.  विद्यार्थ्यांना एक लायब्ररी कार्ड देण्यात आले आहे. अधिकाधिक पुस्तके वाचणार्‍या मुलांचा सन्मान करण्यात येणार आहे. टी. व्ही. आणि मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती दुर्लक्षित होत आहे. अशा वेळी जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती या शाळेत वाचन संस्कृती वाचन चळवळ खोलवर रुजावी म्हणून  ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रम राबवून अधिकाधिक वाचनीय आणि संस्कारक्षम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मौजे धरणगुत्ती या गावात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत टी. व्ही. आणि मोबाइल बंद ठेवून शांततापूर्ण अभ्यासाचे दोन तास असा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जात असून सदर संकल्पनेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गावकर्‍यांचा सक्रिय सहभाग ही एक अत्यंत आनंददायी बाब आहे.  

उन्हाळी सुट्टीत प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजवणे काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती’ या जिल्हा परिषदेच्या शाळेतील आणि परिसरातील अन्य शाळांतील विद्यार्थ्यांचा सुट्टीला वेळ सार्थकी लागावा म्हणून ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला त्यात मामाच्या गावी ‘धरणगुत्ती’ येथे सुट्टीसाठी आलेल्या अनेक पाहुण्या मुला – मुलींचादेखील समावेश आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित करण्यात आलेले ‘बालवाचन संस्कार शिबीर’ आणि संपूर्ण वर्षभरातील अन्य वाचन प्रकल्प यात सक्रिय सहभाग घेतलेल्या उत्कृष्ट वाचकांना पुरस्कार दिले जातात.  अधिकाधिक पुस्तके वाचणार्‍या मुलांचा या माध्यमातून सन्मान करण्यात येतो तसेच अन्य मुलांना वाचण्यासाठी कशी प्रेरणा मिळेल यासाठी त्यांना वेळोवेळी प्रेरित केले जाते. शालेय जीवनात मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांना अतिशय घातक असून; पालकांनी मोबाईलपासून आपल्या मुलांना दूर ठेवावे असे आवाहन करण्यात आले.

सदर उपक्रमाच्या अधिक महितीसाठी आणि सदर आणि अन्य लोकोपयोगी उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती’ या शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय सूर्यवंशी – 9922772814 किंवा ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ या उपक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. सुनील दादा पाटील – 9975873569 यांच्याशी संपर्क साधू शकता.

– संजीवनी बळवंत भिंगारे (8484986064)

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.