आपला जिल्हानिवडणूक

गडचिरोली -भाजपमध्ये ‘ठेकेदार प्रयोग’ सुरू!

एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी

गडचिरोली, प्रतिनिधी :–

गडचिरोली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नव्या सत्तासंघर्षाची सुरुवात झाली आहे. पक्षातील एकनिष्ठ, अनेक वर्षांपासून कार्यरत स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीस उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समोर आले आहे.

या घडामोडींमुळे गडचिरोली भाजपमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आमदारांच्या या निर्णयावर रोष व्यक्त केला असून “पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे” अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

 योगिता पिपरे यांच्यावर अन्याय?एकनिष्ठ कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याची चर्चा

गडचिरोली शहरात विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या पिपरे दाम्पत्याने गेल्या काही वर्षांत नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक भरीव कामे केली आहेत.

शंभर कोटींच्या गटार लाईन प्रकल्पाची अंमलबजावणी, शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सौंदर्यीकरण आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उभारणी या कामांमुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.

“भाजपने चुकीचा निर्णय घेतला, तर काँग्रेसला सत्ता रेडीमेड मिळेल”नागरिकांचा इशारा

शहरातील नागरिक आणि राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, भाजपने जर बाहेरून आलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवला, तर याचा थेट फायदा काँग्रेसला होणार आहे.

गेल्या काही वर्षांत पिपरे दाम्पत्याने जो जनाधार निर्माण केला आहे, तो गमावल्यास भाजपसाठी सत्ता पुन्हा मिळवणे कठीण ठरेल, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.

काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी तर स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा निर्णय पक्षासाठी आत्मघात ठरेल. ठेकेदारांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत; जनता काम पाहते, पैसा नाही.”

भाजपसमोर आता द्विधा परिस्थिती – कार्यकर्त्यांवर विश्वास की पैशावर भरोसा ?

गडचिरोली नगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.

एकीकडे पिपरे दाम्पत्यासारखे अनुभवी, जनाधार असलेले कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे बाहेरून आलेले पैशाच्या बळावरचे उमेदवार.

भाजपने चुकीचा निर्णय घेतल्यास कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका थेट मतपेटीत बसू शकतो.

राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, “भाजपने जर एकनिष्ठ, जनतेशी जोडलेले आणि विकासाभिमुख नेतृत्व पुढे केले, तर गडचिरोलीत भगवा पुन्हा फडकेल; अन्यथा सत्ता गमावणे अपरिहार्य ठरेल.”

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker