आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
कोरची बोगाटोला येथील खून प्रकरण उघड; ७२ तासांत ५ आरोपींना अटक

गडचिरोली, प्रतिनिधी :-
पोस्टे कोरची पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या गुणवत्तापूर्ण तपास करत अवघ्या ७२ तासांत खून प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा बोगाटोला, ता. कोरची, जि. गडचिरोली येथील जंगल परिसरात ३१ जानेवारी २०२६ रोजी अज्ञात इसमाचा अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटविणे आणि तपास करणे पोलीसांसाठी मोठे आव्हान होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोरची पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान वैद्यकीय अहवालातून मृत्यू मानेवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २ फेब्रुवारी २०२६ रोजी पोस्टे कोरची येथे अप.क्र. १९/२०२६ कलम १०३ (१), २३८ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपासात गोपनीय बातमीदार व घटनास्थळावरील दुव्यांच्या आधारे मृताची ओळख जितू कवंर (वय ३० वर्षे, रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) अशी पटली. तपासात उघड झाले की, आरोपी शानु पठाण (रा. जांभुळखेडा, ता. कुरखेडा) याचे जितू कवंर यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात जितू कवंर अडसर ठरत असल्याने आरोपींनी कट रचून खुर्शिपार, ता. कोरची येथे धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.
या प्रकरणी पोलीसांनी आरोपी शानु पठाण (३६), पुंकेश बोरकर (३२), चंद्रशेखर गुज्जेवार (२७), धनपाल मडावी (२१) सर्व रा. जांभुळखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली तसेच सोनाली कवंर (२५), रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ.ग.) यांना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक केली.



