आपला जिल्हाराजकीय

केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण विकासाचा दिशादर्शक – आमदार प्रवीण दटके

भाजपकडून पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाचे स्वागत; दुर्गम व आदिवासी भागाच्या विकासावर भर

गडचिरोली प्रतिनिधी :-
भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ संदर्भात आयोजित पत्रकार परिषद आज सर्किट हाऊस शासकीय विश्रामगृह संकुल येथे पार पडली. या पत्रकार परिषदेला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, गडचिरोली नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे, माजी नगराध्यक्षा तथा भाजपा महिला जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, भाजपा लोकसभा प्रमुख प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार प्रवीण दटके यांनी केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारा असल्याचे सांगितले. शेतकरी, युवक, महिला, आदिवासी समाज, लघुउद्योजक आणि मध्यमवर्गीय घटकांना बळ देणारा हा अर्थसंकल्प आशादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी जिल्ह्यातील रेल्वे विस्ताराबाबत माहिती देताना आदिवासी, वनवासी व दुर्गम भागांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचे स्वागत केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यांच्या प्रगतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प असून केंद्र सरकारचा “सबका साथ, सबका विकास” हा संकल्प प्रत्यक्षात उतरवणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला भाजप गटनेते तथा सभापती अनिल कुनघाकर, महिला व बालकल्याण सभापती सिमा कन्नमवार, शिक्षण सभापती हर्षल गेडाम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मान्यवरांनी अर्थसंकल्पातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. अखेरीस भाजप गडचिरोली जिल्हा वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker