गडचिरोली, प्रतिनिधी :-
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी अध्यासन केंद्रा’च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता विद्यापीठाच्या जुन्या सभागृहात करण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांच्या विचारधारा, जीवनकार्य आणि सामाजिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास, संशोधन व समाजप्रबोधनाच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक समता, ग्रामविकास आणि नैतिक मूल्यांवर आधारित संशोधनाला चालना दिली जाणार आहे. तसेच सामाजिक प्रश्न, लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय, शांतता आणि मानवतावादी दृष्टिकोन यांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, व्याख्याने, परिसंवाद व विस्तारकार्य राबविण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहणार असून उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे समाजशास्त्रज्ञ डॉ. अंबादास मोहिते उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित राहतील.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समन्वयक म्हणून डॉ. प्रमोद आर. जावरे कार्यरत असून प्रस्तावक व प्रसारक म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक गोर्लावार योगदान देत आहेत. या उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.
Back to top button