अपघातताज्या घडामोडी
बारामती विमान अपघात : फ्लाइट रेकॉर्डर डेटा मिळविण्याची प्रक्रिया वेगवान; चौकशी सुरू

बारामती, प्रतिनिधी :-
पुणे जिल्ह्यात २८ जानेवारी रोजी झालेल्या Learjet 45 VT-SSK विमान अपघाताच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाल्याची माहिती एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) यांनी दिली आहे. विमान अपघात व घटना तपास नियम २०१७ तसेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना च्या अनुलग्नक १३ नुसार तपास प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित विमानात बसवण्यात आलेल्या दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डरपैकी डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती एएआयबीच्या प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आली आहे. तर हनीवेल निर्मित कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची सखोल तपासणी सुरू असून डेटा पुनर्प्राप्तीसाठी तांत्रिक सहकार्य मागविण्यात आले आहे. अपघातानंतर रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना आगीचे नुकसान झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
तपास प्रक्रिया निःपक्षपाती, पारदर्शक व पुराव्यावर आधारित पद्धतीने सुरू असून योग्य टप्प्यावर अधिक माहिती जाहीर करण्यात येईल, असे एएआयबीने सांगितले आहे.



