आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

मुरूम उत्खननावरून मध्यरात्री तुफान हाणामारी; आमदारासह सहा जणांवर गुन्हा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननावरून मंगळवारी मध्यरात्री तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत कुणाल विकास राजगडे (२४, रा. निमगाव) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजता मुरूम उपसा सुरू असताना आमदार मसराम हे आपल्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. “येथे मुरूम उत्खनन कशाच्या परवानगीवर सुरू आहे?” अशी विचारणा करत त्यांनी मजुरांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

जखमी मजूर कुणाल राजगडे याने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगून संबंधित कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतर वाद चिघळल्याचा आरोप आहे. संतप्त जमावाने काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त शिक्षक धनपाल मिसार, आमदार रामदास मसराम, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही मारहाण केवळ मुरूम उत्खननाच्या वादातून झाली की यामागे अन्य कारण आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker