आपला जिल्हाक्राईम
गडचिरोलीत जात पडताळणीसाठी लाच प्रकरण; दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात पकडले

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, गडचिरोली येथे जात पडताळणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे करण्यात आली.
या प्रकरणात मंगेश मनोहर आंबोरकर (वय ४२, प्रकल्प सहाय्यक – कंत्राटी) व दिनेश कवडु सिडाम (वय ३८, कार्यालय सहाय्यक – कंत्राटी) या दोघांविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ३७१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदाराने आपल्या मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी ३१ मार्च २०२६ रोजी अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात आरोपी मंगेश आंबोरकर यांनी कागदपत्रे अपलोड करून प्रमाणपत्र देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर कार्यालय सहाय्यक दिनेश सिडाम यांनीही आंबोरकर यांच्या वतीने २,००० रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २ एप्रिल २०२६ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली येथे तक्रार नोंदवली. एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. तडजोडीनंतर १,००० रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना पथकाने रंगेहात पकडले.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कारवाई:-
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांनी पर्यवेक्षण केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
नागरिकांना आवाहन :-
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास त्वरित अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांनी केले आहे.
संपर्कासाठी:-
व्हॉट्सअॅप – ७५८८०४१०६४
दुरध्वनी – ०७१२-२९५०२०
टोल फ्री – १०६४



