अपघातताज्या घडामोडी
गडचिरोली हादरली! गिझरच्या ‘शॉक’ने तरुण व्यावसायिकाचा अंत; कारगील चौक परिसरात मोठी हळहळ

गडचिरोली,विशेष प्रतिनिधी :-
एका बाजूला सण-उत्सवाचे वातावरण असतानाच, गडचिरोली शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील गिझरचा शॉक लागल्याने कारगील चौक परिसरातील एका तरुण आणि मनमिळावू व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. जयंत मनोहर भांडेकर असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण मिरची गल्ली आणि कारगील चौक परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत भांडेकर हे शहरातील प्रसिद्ध ‘जयंत आटा चक्की’चे संचालक होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटोपून ते काल रात्री घरी परतले. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता, गिझरच्या विद्युत प्रवाहाचा (इलेक्ट्रिक शॉक) त्यांना जोरदार झटका बसला. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी पाहिले असता, जयंत हे बाथरूममध्ये निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एक हसतमुख चेहरा हरपला !
जयंत भांडेकर हे केवळ एक कष्टकरी व्यावसायिक होते. ते अत्यंत साध्या आणि मनमिळावू स्वभावाचे होते. परिसरातील प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा अकाली आणि अनपेक्षित निधनामुळे भांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा आहे.
सावधान ! तुमचे ‘गिझर’ ठरू शकते जीवघेणे; ‘महाभारत न्यूज’चे विशेष आवाहन:
ही घटना आपल्या सर्वांसाठी एक धोक्याची घंटा आहे. विद्युत उपकरणांचा वापर करताना खालील खबरदारी घेणे आता अनिवार्य झाले आहे:-
* जुनी वायरिंग बदला: जर तुमच्या घराची इलेक्ट्रिकल वायरिंग जुनी झाली असेल, तर ती त्वरित तज्ज्ञ इलेक्ट्रीशियनकडून तपासून घ्या.
* अर्थिंगची तपासणी: घरातील अर्थिंग (Earthing) योग्य आहे का, याची खात्री करा. अर्थिंग नसल्यास शॉक लागण्याचा धोका सर्वाधिक असतो.
* गिझर सुरू असताना आंघोळ टाळा: शक्य असल्यास पाणी गरम झाल्यावर गिझरचा स्विच ‘ऑफ’ करूनच आंघोळीला जावे.
* ओले हात आणि पाय: ओल्या हाताने स्विचला स्पर्श करणे टाळा आणि बाथरूममध्ये रबरी चप्पल किंवा मॅटचा वापर करा.



