आपला जिल्हाक्राईम

आरमोरी हादरले! प्रेमजाळ्यात ओढून ‘हनी ट्रॅप’

गडचिरोली, प्रतिनिधी :-

प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणे, त्यानंतर बदनामीची भीती दाखवत लाखो रुपयांची खंडणी उकळणे आणि शेवटी मागणी पूर्ण न झाल्याने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे, असा अत्यंत धक्कादायक प्रकार आरमोरी येथे उघडकीस आला आहे. आरोपींनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण करून बळजबरीने कीटकनाशक पाजल्याची घटना ३ एप्रिल रोजी समोर आली असून, या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. कालांतराने त्या तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच परिस्थितीचा फायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थीचा आव आणत कट रचला.

“तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझ्या कुटुंबाची बदनामी करू,” अशी धमकी देत आरोपींनी पीडित तरुणाला ब्लॅकमेल केले. बदनामीच्या भीतीमुळे त्या तरुणाने आतापर्यंत सुमारे ४ लाख रुपये आरोपींना दिल्याची माहिती समोर आली आहे.

मारहाण करून पाजले विष

मोठी रक्कम उकळूनही आरोपींचे समाधान न झाल्याने त्यांनी आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. “पैसे दे, नाहीतर स्वतःचा जीव घे, अन्यथा आम्ही तुला संपवू,” अशी धमकी देण्यात आली.

१३ मार्च २०२६ रोजी ब्रह्मपुरी मार्गावर जात असताना आरोपींनी पीडित तरुणाला अडवून बेदम मारहाण केली आणि बळजबरीने शेतीमध्ये वापरले जाणारे कीटकनाशक पाजले. तरुण बेशुद्ध पडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गुन्हा झाकण्यासाठी आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. तरुणाला विष पाजल्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा, मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो पाठवून प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा आभास निर्माण करण्यात आला.

दरम्यान, विषप्राशनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या तरुणाला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३ एप्रिल रोजी तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. या खुलाशामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.

पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींनी इतर कुणालाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढले आहे का, याचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker