आपला जिल्हाताज्या घडामोडी

अर्धवेळ स्त्री परिचर संघटनेचा (सिटू) जिल्हा मेळावा संपन्न

मानधनवाढीसह विविध मागण्यांवर ठाम भूमिका

गडचिरोली, प्रतिनिधी :-

अर्धवेळ स्त्री परिचर संघटनेचा (सिटू) जिल्हा मेळावा गडचिरोली येथील सेमाना देवस्थानच्या सभागृहात उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माकपा जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. अरुण भेलके (चंद्रपूर) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड आणि सतीश दुडमलवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात अर्धवेळ स्त्री परिचर म्हणून कार्यरत महिलांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सन 1962 पासून या महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, सुरुवातीला केवळ ५० रुपये मानधनावर त्यांनी सेवा बजावली. पुढील काळात मानधन वाढून तीन हजार आणि सध्या सहा हजार रुपये करण्यात आले असले, तरीही ते अत्यंत अपुरे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

काम अर्धवेळ असले तरी प्रत्यक्षात दररोज ८ ते १० तास काम करावे लागते. अत्यल्प मानधनावरही या महिला जनतेच्या आरोग्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. विशेषतः कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम केले, असे मत व्यक्त करण्यात आले.

मात्र शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कॉ. अमोल मारकवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला. सिटू संघटनेच्या संघर्षामुळे मानधन सहा हजारांपर्यंत वाढले असले, तरी ते पुरेसे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यात अर्धवेळ स्त्री परिचरांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मासिक मानधन किमान २० हजार रुपये करावे, दरमहा ५ हजार रुपये पेन्शन लागू करावी तसेच कोरोना काळातील विशेष भत्ता द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

मेळाव्यास कॉ. अर्चना मारकवार, वैशाली शास्त्राकार, भाविका राऊत, ज्योती देवानंद दुर्गे, सुरेखा केळझरकर, साबेसा शेख, रेखा बंडावार, शामलता कुंभारे, रसिका मोहुर्ले, जया कन्नाके, अनिता नैताम, कुसुम चंदेल, देवलाबाई भैसा, रेवता सहारे, कुसुम मरसकोल्हे, निशा कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker