आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
वानरचुवा जंगलात अवैध हातभट्टीवर धानोरा पोलिसांची कारवाई
दोन कारवायांत ३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल नष्ट; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात धानोरा पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. धानोरा तालुक्यातील वानरचुवा जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी एकूण ३ लाख ४४ हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा व मोहफुलाचा सडवा नष्ट केला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १६ ऑगस्ट रोजी धानोरा पोलिसांच्या पथकाने वानरचुवा येथील जंगल परिसरात पाहणी केली. यावेळी प्रमोद अंताराम हलामी याच्या घरामागील जंगलात अवैध हातभट्टी दारू तयार करण्याची भट्टी आढळून आली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
पंचांसमक्ष केलेल्या पाहणीत १५ प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ३ हजार किलो मोहफुलाचा सडवा, अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा, तसेच २० लिटर हातभट्टी दारू, अंदाजे ४ हजार रुपये किमतीची, असा एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी हा सडवा व तयार दारू घटनास्थळीच नष्ट केली. या प्रकरणी प्रमोद हलामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच परिसरात शिवराम अन्नाजी बोगा हा आपल्या घराजवळील झोपडीत मोहफुलाची दारू विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार धाड टाकली असता २०० लिटर मोहफुलाची दारू, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची, आढळून आली. हा साठाही पोलिसांनी नियमानुसार घटनास्थळीच नष्ट केला. याप्रकरणी शिवराम बोगा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



