अपघातताज्या घडामोडी

गडचिरोलीत मन्यार सापाच्या -दंशाने तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू; तीन गंभीर

जपतालाई आश्रमशाळेतील धक्कादायक घटना; घाबरलेल्या विद्यार्थिनींवरही उपचार सुरू

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील जपतालाई आश्रमशाळेत मन्यार सापाच्या दंशाने तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्पदंशाची घटना समोर आल्यानंतर काही विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्याने त्यांच्यावरही वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ही घटना समोर आल्यानंतर आश्रमशाळा परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मन्यार सापाच्या दंशामुळे विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,दोघांचा धानोरा येथे झाला.तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थिनींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही विद्यार्थिनी घाबरून गेल्याने त्यांच्यावरही डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर लगेचच ही दुर्दैवी घटना घडल्याने आदिवासी समाजात हळहळ व्यक्त होत आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या उत्साहावर या घटनेने दुःखाचे सावट पसरले आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली जात असून, विद्यार्थिनींच्या उपचारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, सर्पदंश प्रतिबंधक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा सक्षम आहेत का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker