गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीवर चौकशी होऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करीत माजी पंचायत समिती सदस्य अमिता शामकांत मडावी यांनी नागपूर येथील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. उपसंचालकांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. मात्र, पुढील १५ दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मडावी यांनी दिला आहे.
डॉ. वर्षा लहाडे यांच्या कामकाजाबाबत मडावी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, उपसंचालक आरोग्य सेवा तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे जून महिन्यात विविध तक्रारी व निवेदने सादर केली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांच्या कार्यालयामार्फत त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली होती. समितीने १४ जुलै रोजी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष चौकशी करून विविध मुद्द्यांवर निरीक्षणे व निष्कर्ष नोंदविल्याचे उपसंचालकांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चौकशीनंतर खुलासा मागविला
चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आल्याचे उपसंचालकांनी मडावी यांना दिलेल्या लेखी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच तक्रारीतील विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने पुन्हा चार सदस्यीय चौकशी समिती ११ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात चौकशीसाठी येणार असल्याचेही पत्रात नमूद आहे.
विभाग तक्रारीकडे गांभीर्याने पाहत असून चौकशी अहवालाच्या आधारे नियमानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मडावी यांनी आंदोलन मागे घेतले.
‘कारवाई न झाल्यास पुन्हा ठिय्या’
मात्र, चौकशीची प्रक्रिया सुरू असूनही कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप मडावी यांनी केला आहे. पुढील १५ दिवसांत डॉ. लहाडे यांच्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही न झाल्यास नागपूर येथील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मडावी यांनी आपल्या तक्रारीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रशासकीय निर्णय, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांमधील अडचणी, मनुष्यबळाचा वापर, सुरक्षारक्षकांची नियुक्ती तसेच रुग्णालयातील काही विभागांच्या स्थलांतरासह विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
अहेरीतील डॉक्टरांच्या राजीनाम्याचाही मुद्दा
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील काही डॉक्टरांनी डॉ. लहाडे यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेत एकाच वेळी राजीनामे दिल्याचा दावाही मडावी यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांच्या राजीनाम्यांची कारणे आणि त्यामागील प्रशासकीय परिस्थितीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, डॉ. लहाडे यांच्या कार्यपद्धतीबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर त्यांची स्वतंत्र बाजू या निवेदनात उपलब्ध नसल्याने, आरोपांची सत्यता चौकशीच्या निष्कर्षांवरच स्पष्ट होणार आहे.
आरोग्य विभागाच्या पत्रात काय ?
उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळाचे डॉ. शशिकांत शंभरकर यांनी मडावी यांना दिलेल्या पत्रात, तक्रारीच्या अनुषंगाने त्रिसदस्यीय चौकशी समितीने प्रत्यक्ष चौकशी केली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच पुन्हा चार सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे नमूद करून, चौकशी अहवालाच्या आधारे आवश्यक प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आता या चौकशीचा अहवाल आणि त्यानंतर आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कार्यवाहीकडे गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button