आपला जिल्हाताज्या घडामोडी

विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे वैनगंगेच्या तीरावर प्रथमच महागंगा पूजा-आरती

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांची विशेष उपस्थिती

गडचिरोली, प्रतिनिधी :-

‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर प्रथमच ‘महागंगा पूजा-आरती’ भक्तिमय वातावरणात पार पडली. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला असून, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महागंगा पूजा-आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मार्कंडेश्वर ऋषी देवाची विधिवत पूजा-अर्चना व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर वैनगंगा नदीच्या तीरावर मंत्रोच्चारांच्या वातावरणात ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यात आले.

शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात गंगापूजन व महाआरती संपन्न झाली. नदीच्या पवित्र प्रवाहासमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आलेल्या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने वैनगंगा तीर दुमदुमून गेला.

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक सुनील मित्रा, अनिरुद्ध पालकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूरचे आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी अविशयांत पंडा, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे यांच्यासह विविध पदाधिकारी, महाराज मंडळी, भाजप कार्यकर्ते आणि हजारो भाविक उपस्थित होते.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी वैनगंगेच्या तीरावर झालेल्या या महागंगा पूजा-आरतीमुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवात एक नवा अध्याय जोडला गेल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे मार्कंडा देवस्थानचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होऊन वैनगंगेच्या पावन तीराला एका नव्या आध्यात्मिक परंपरेची जोड मिळाली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker