आपला जिल्हाताज्या घडामोडी
चामोर्शीत विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राला मान्यता,आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पाठपुराव्याला यश
गडचिरोलीतील मत्स्यव्यवसायाला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाची जोड देण्यासाठी चामोर्शी येथे विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण उपक्रमाला गती मिळाली असून, स्थानिक मच्छीमार, आदिवासी बांधव तसेच बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या केंद्राच्या स्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीतील मत्स्यव्यवसायाची मोठी क्षमता लक्षात घेऊन आधुनिक प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आमदार डॉ. नरोटे यांनी बैठकीत मांडली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलस्रोत उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर करून मत्स्य उत्पादन वाढविण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या उत्पन्नात वाढ करण्याची मोठी संधी आहे.
आमदार डॉ. नरोटे यांच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश
गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून मत्स्यव्यवसायाला व्यावसायिक आणि आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चामोर्शीत विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राला मिळालेली मान्यता ही गडचिरोलीच्या मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वाची पायरी असून, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रयत्नांना मिळालेले महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.



