आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आजाद समाज पार्टीचा घेराव

गडचिरोली, प्रतिनिधी :-
‘पूल कोसळतो, भ्रष्टाचार उघड होतो; तरीही कारवाई का नाही?’ असा सवाल करीत मुख्यमंत्री व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल कोटी–कोरणार पुलिया दुर्घटना आणि त्यामागील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घेराव आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या शेकडो नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद आणि बिरसा ब्रिगेड यांनीही आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.
आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनावरही जोरदार टीका केली. “पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होते. काही वर्षांतच निकृष्ट बांधकामाचा आरोप पुढे येतो आणि पुलिया दुर्घटनाग्रस्त होते. घटना घडून २० दिवस उलटूनही जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई का होत नाही?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.
‘२४ तासांत कारवाई, मग पुलिया प्रकरणात विलंब का?’
जपतलाई आश्रमशाळेतील दुर्घटनेनंतर तातडीने कारवाई करण्यात आली, मात्र कोटी–कोरणार पुलिया प्रकरणात २० दिवस उलटूनही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. संबंधित संस्था काँग्रेसशी संबंधित असल्याने सरकारची भूमिका वेगळी आहे का, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
“हा सरकारचा दुहेरी न्याय आहे का? भ्रष्टाचाराच्या आरोपांतील अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण दिले जात आहे का?” असा सवाल आजाद समाज पार्टीने केला.
जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेरले
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप शासनाकडे स्वतःचा अहवाल, प्रस्ताव किंवा पत्रव्यवहार केलेला नसल्याचे सांगितल्याचा दावा आंदोलकांनी केला. यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांना घेराव घातला.
आंदोलनानंतर वरिष्ठ प्रशासनाशी चर्चा करून या प्रकरणाबाबत अहवाल सादर करण्याची कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
‘पालकमंत्री राजीनामा द्या’च्या घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनस्थळी ‘पालकमंत्री राजीनामा द्या’, ‘अधीक्षक अभियंत्यांना निलंबित करा’, ‘भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध मागण्यांचे पोस्टर्सही आंदोलनस्थळी लावण्यात आले होते.
आंदोलनकर्त्यांनी कोटी–कोरणार पुलिया प्रकरणातील संबंधित अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली.
तसेच अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यकाळातील सुमारे ५५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी आणि विकासकामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य देण्याची मागणीही करण्यात आली.
‘कागदी अहवाल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही’
आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यापूर्वीच्या अहवालांवरही प्रश्न उपस्थित केले. पुलिया दुर्घटनेनंतर केवळ कागदी अहवाल तयार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार दोघांनाही कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे. कारवाई झाली नाही तर जनतेच्या न्यायासाठी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा राज बन्सोड यांनी दिला.
विविध संघटनांचा सहभाग
आंदोलनाचे नेतृत्व आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, हंसराज उराडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे आणि बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश वरखडे यांनी केले.
यावेळी आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, महासचिव अंकुश कोकोडे, नागसेन खोब्रागडे, धनराज दामले, प्रकाश बन्सोड, किशोर उसेंडी, सावन चिकराम, प्रेम मडावी, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, सविता बांबोळे, मंगेश बन्सोड, सतीश दुर्गमवार, शुभम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कोटी–कोरणार पुलिया प्रकरणातील दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. जनतेच्या पैशांचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल, असा इशारा आजाद समाज पार्टीसह सहभागी संघटनांनी दिला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



