आपला जिल्हाताज्या घडामोडी
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार असोसिएशनतर्फे विविध उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त लांजेडा येथील निवासी अपंग विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी छायाचित्रण क्षेत्राचे सामाजिक महत्त्व, बदलते तंत्रज्ञान आणि डिजिटल युगातील छायाचित्रकारांसमोरील नव्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
छायाचित्र हा केवळ क्षण टिपणारा माध्यम नसून इतिहासाचा दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी केले. एका छायाचित्रातून एखाद्या घटनेचा इतिहास, सामाजिक परिस्थिती तसेच मानवी भावभावना प्रभावीपणे मांडता येतात. त्यामुळे छायाचित्रकारांनी आपल्या कलेसोबत सामाजिक बांधिलकीही जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
मोबाईल फोटोग्राफी, आधुनिक कॅमेरे, ड्रोन आणि डिजिटल माध्यमांमुळे छायाचित्रण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. या बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून छायाचित्रकारांनी आपल्या कौशल्यात सातत्याने भर घालावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, विद्यालयाचे अधीक्षक भास्कर दोनाडकर, नगरसेवक रवी मेश्राम, राहुल टहलीयानी, प्रवीण बांदूरकर, नरेंद्र बोढाले यांच्यासह जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भविष्यात छायाचित्रणाच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. “वेळेला आणि काळाला बांधून ठेवते, ते म्हणजे छायाचित्र!” या संदेशातून छायाचित्रकलेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



