आपला जिल्हाताज्या घडामोडी
जपतलाई आश्रमशाळेची मान्यता पूर्ववत करून शाळा सुरू करण्याची आदिवासींची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची रद्द केलेली मान्यता पूर्ववत करून शाळा तातडीने सुरू करावी, अशी मागणी जपतलाई येथील आदिवासी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१० ऑगस्ट रोजी जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शासनाने तातडीने संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करून शाळा बंद केली. त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपापल्या गावात परतावे लागले असून, त्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
जपतलाई येथील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील इतर आश्रमशाळांमध्ये समायोजित करण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक अनुदानित व शासकीय आश्रमशाळांची स्थिती समाधानकारक नसून मूलभूत सुविधांची कमतरता आहे. काही ठिकाणी जपतलाईपेक्षाही इमारती व पायाभूत सुविधांची परिस्थिती खराब असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्यत्र पाठवल्यास त्यांच्या शिक्षणावर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
शाळेची मान्यता पूर्ववत करून प्रशासनाने आवश्यक असल्यास शाळेचा ताबा घ्यावा आणि याच ठिकाणी कार्यरत शिक्षकांच्या माध्यमातून शाळा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यसभा खासदार माया इवनाते, माजी नगरसेविका तथा ज्येष्ठ आदिवासी नेत्या माधुरी मडावी आणि अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी जपतलाई आश्रमशाळेला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना माधुरी मडावी यांनी विद्यार्थ्यांना अन्य आश्रमशाळेत पाठविण्याऐवजी जपतलाई येथेच शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली
जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांची परिस्थिती जपतलाईसारखी किंवा त्यापेक्षाही खराब असल्याने विद्यार्थ्यांना इतरत्र पाठविणे योग्य ठरणार नाही. शासनाने तातडीने जपतलाई आश्रमशाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शासनाने जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केल्याचे आदेश सोमवारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले असून, संबंधित विद्यार्थ्यांना इतर आश्रमशाळांमध्ये समायोजित करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी महत्त्वाची ठरली आहे.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये, अशी एकूण १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबीयांची आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही मदत त्यांच्या कायदेशीर वारसांना वितरित करण्यात येणार आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



