आपला जिल्हाताज्या घडामोडी
सहा महिने उलटूनही सोलर पंप नाही; शेकापचा इशारा

मुलचेरा, प्रतिनिधी :-
अग्रीम रक्कम भरून सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यात आले नसल्याने मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाने विद्युत विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने सोलर पंप बसविण्यात यावेत, अन्यथा आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.
यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे भरली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही सोलर पंप बसविण्यात आलेले नाहीत.
सोलर पंपाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून, पाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. विद्युत विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने सोलर पंप बसवून देण्यात यावेत. अन्यथा विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला.
यावेळी हरिदास तोरे, साईनाथ सेडमाके, भुरू पेंदाम, रोशन मडावी, गुरुदास सेडमाके, आशिष पेंदाम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



