आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोलीत पर्यटन व रोजगाराला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांचा प्रस्ताव

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी

मुंबई, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहर व जिल्ह्यातील वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्याचा विकासासाठी प्रभावी वापर करून पर्यटनासोबतच स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडले.

गडचिरोली शहरातील फॉरेस्ट डेपो परिसरात वॉकिंग ट्रॅक विकसित करावा, अशी मागणी आमदार डॉ. नरोटे यांनी केली. नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासोबतच शहरातील उपलब्ध वनक्षेत्राचा सार्वजनिक उपयोग करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच चामोर्शी (सोनापूर) येथे इको पार्क, तर गडचिरोलीतील सेमाना उद्यानाजवळ बायोडायव्हर्सिटी पार्क व प्राणीसंग्रहालय विकसित करण्याचा प्रस्तावही वनमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे यावेळी नमूद करण्यात आले.

वन्यजीव उपचारासाठी ट्रान्झिट सेंटरची मागणी

गडचिरोलीतील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेता जखमी अथवा संकटग्रस्त वन्यप्राण्यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी स्वतंत्र वन्यजीव ट्रान्झिट सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणीही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली. यामुळे वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात अधिक सक्षम यंत्रणा उभारण्यास मदत होणार आहे.

वनजमिनीच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मिती

गडचिरोली शहरातील मुख्य चौक परिसरातील उपलब्ध वनजमिनीचा योग्य नियोजनातून उपयोग करून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देता येईल, याबाबतही वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करण्यात आली. या माध्यमातून स्थानिक बचत गट, युवक आणि उद्योजकांना सहभागी करून घेण्याची सूचना आमदार डॉ. नरोटे यांनी केली.

गडचिरोलीच्या वनसंपदेचे संरक्षण करतानाच तिच्या माध्यमातून पर्यटन, रोजगार आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना देण्याची गरज आहे. वनसंपदा संवर्धन, पर्यटनविकास आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधून जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केली.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker