देश विदेश
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची – राष्ट्रपती मुर्मू
गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण

गडचिरोली,प्रतिनिधी :-
देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले.
गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती मुर्मू पुढे म्हणाल्या, गोंडवाना विद्यापीठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी, मागास घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालेल्या उपयुक्त शिक्षणातून याठिकाणी विद्यार्थी घडत आहेत. या विद्यापीठात चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचा फायदा येथील पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती व परंपरा जपण्यासाठी होईल.
या भागातील अनेक आदिवासी समूह राष्ट्रपती भवनात आपणास भेटण्यासाठी येत असल्याचे सांगून राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या. या घटकांकडून संपुर्ण देशाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चांगली चालना दिली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्हयांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपले प्रयत्न व जिद्द कायम ठेवावी. गोंडवाना विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर जाईल याची मला खात्री आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक व आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी
राष्ट्रपतींच्या हस्ते अमित रामरतन गोहने (मानव विज्ञान विद्याशाखा), अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), लोकेश श्रीराम हलामी व सदाफ नफीस अहमद अन्सारी (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), संतोष प्रकाश शिंदे (आंतर विज्ञान विद्याशाखा) यांना सुवर्णपदक तर सारिका बाबुराव मंथनवार यांना शिक्षणशास्त्र या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.




