गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुगंधित तंबाखूसह एकूण ९ लाख ७२ हजार ७२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या पथकाने चामोर्शी मार्गावर केली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार तसेच अन्य अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, चारचाकी वाहनातून गडचिरोली-चामोर्शी मार्गावरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील पोहार नदीच्या पुलाजवळ, कुरुड गाव परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्रमांक एमएच ३३ टी ५८९२ येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली.
वाहनाच्या झडतीदरम्यान विविध प्रकारचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. त्यामध्ये ‘होला हुक्का टोबॅको’चे २०० ग्रॅम वजनाचे १,८०० पॅकेट, ‘मजा’ सुगंधित तंबाखूचे ५० ग्रॅम वजनाचे ४०० डबे, ‘ईगल’चे ११५ पॅकेट तसेच ‘ईगल हुक्का शिसा तंबाखू’चे ४० ग्रॅम वजनाचे ४०० डबे यांचा समावेश आहे. यासोबतच तंबाखू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो मॅक्स पिकअप वाहनही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी नंदकिशोर दिवरुजी शेट्टे (२१, रा. चामोर्शी) आणि राजेंद्र ईश्वर नैताम (२१, रा. मार्कंड मोहल्ला, चामोर्शी) यांना अटक केली आहे. चौकशीत सदर तंबाखू चंद्रकांत शत्रुघ्न पिपरे, रा. चामोर्शी, याने आणण्यास सांगितल्याचे तसेच वाहन त्याच्याच मालकीचे असल्याचे आरोपींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश पोसन्ना तोर्रेम यांच्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मानकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने केली.
Back to top button