राजकीय
भाजपने शिवसेनेला डावलले जिल्हा नियोजन समिती वर नाराजी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजपाने फेकून दिल्याने गडचिरोली शिवसेना मध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. हि समिती रद्द करावी अशी मागणी करीत जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेच्या फुटी नंतर दोन शिवसेना तयार झाले आहे. जे पूर्वी पासून शिवसेनेत होते ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. शिवसेना शिंदे गटाला दूर ठेवत जिल्हा नियोजन समिती मध्ये सर्व भाजपचे पदाधिकारी यांना स्थान दिले. या मुळे शिवसेने मध्ये नाराजी असून आपला मागील ग्रामपंचायत,गोंडवाना विद्यापीठ सिनेट आणि आताच बाजार समितीच्या निवडणुकीत वापर झाल्याचा प्रत्यय या गटाला आला आहे.
गोंडवाना विद्यापीठ सिनेट मध्ये दोन नामनिदर्शित सदस्य करिता नावे पाठविली होती. या दोन्ही नावाला केराची टोपली दाखविण्यात आली होती. राज्यात युतीत ६०-४० चा फार्मुला असतांना या तिन्ही निवडणुकीत याचे पालन झाले नाही असा आरोप हेमंत जम्बेवार यांनी केला असून भविष्यात होणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत स्व बळावर शिवसेना लढेल असा इशारा या वेळी पदाधिकारी यांनी दिला.
गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेत फुट पाडण्यात महत्वाची भूमिका घेणारे किरण पांडव यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे असून भाजपने त्यांचा सुद्धा या जिल्ह्यातून पत्ता कट केला गेला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.



