आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोली पोलीस दलाचा अंमली पदार्थांविरोधात पुढाकार
शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची जनजागृती बैठक

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या “नशा मुक्त भारत २०४७” अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “एक युद्ध नशे के विरुद्ध” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुरुवारी (दि. ३० जुलै) जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे, व्यसनाची प्रारंभिक लक्षणे ओळखणे आणि वेळेत समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गावर आणण्याबाबत मुख्याध्यापकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधी जनजागृतीसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व, पथनाट्य आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी व्यायाम व खेळांना प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला.
तसेच शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृह परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळावी यासाठी तक्रार पेटी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक महाविद्यालयात अँटी ड्रग कमिटी स्थापन करून वसतिगृहांमध्ये अँटी ड्रग सर्व्हेलन्स स्कॉड तयार करण्याचा सल्लाही देण्यात आला.
याशिवाय शाळांच्या परिसरातील संशयास्पद ठिकाणे, कॅन्टीन, खाद्यपदार्थ व स्टेशनरी दुकाने, तसेच विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येणाऱ्या ऑनलाइन पार्सल आणि ई-सिगारेटसारख्या वस्तूंवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास त्यांचे तातडीने समुपदेशन करण्याचे आवाहनही करण्यात आले.




