क्राईम
पोलीस बनून वर्षभर वावरली, प्रेरणादायी भाषणंही दिली, अखेर होणाऱ्या नवऱ्यामुळे

महिला काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर पडत असतात…” असं तिनं एकदा भाषणात म्हटलं होतं. तिलाही काहीतरी मिळवायचं होतं. पण ते मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केला आणि तो मार्ग तिला तुरुंगापर्यंत घेऊन गेला.
हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी मालविका नावाच्या एका महिलेला अटक केली आहे.रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वर्षापेक्षा अधिक काळापासून मालविका लोकांना फसवत होती.
मालविका नालगोंडा जिल्ह्याची रहिवासी आहे. वर्षभर ती सगळीकडं पोलिसाच्या गणवेशातच जायची आणि पोलिस असल्यासारखंच वागायची.ही महिला रेल्वेमध्ये चेकिंग करायची, सोहळ्यांमध्ये तसंच नातेवाईकांच्या घरी आणि मंदिरांतही पोलिसाच्या गणवेशात जाऊन सगळ्यांसमोर मिरवत असायची.पण तिनं जेव्हा स्वतःच्या साखरपुड्यातही पोलिसाचाच गणवेश परिधान केला, तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला. त्यामुळे तिचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडलं.
पण जवळपास एक वर्ष पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून ती अधिकारी असल्याचा बनाव करत फिरत राहिली, तरी तिला कोणी पकडलं कसं नाही ?
नेमकं काय घडलं ?
जदाला मालविका ही महिला नालगोंडा जिल्ह्याच्या नरकटपल्लीमधील जदाला यादैया यांची मुलगी आहे.मालविका हिचं लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. तिच्या आई-वडिलांचीही तिनं पोलीस अधिकारी व्हावं अशी इच्छा होती.
मालविकानं निजाम कॉलेजमधून एमएससी पूर्ण केलं. 2018 मध्ये तिनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) मध्ये एसआय पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला.पण, दृष्टीतील काही समस्येमुळं शारीरिक क्षमता चाचणीत ती उत्तीर्ण झाली नाही. त्यामुळं तिनं लेखी परीक्षाही दिली नाही.पण नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मात्र ती लेखी परीक्षेत पास झाली असून लवकरच तिला नोकरीही मिळणार आहे, असंच वाटत होतं.
“शारीरिक क्षमता चाचणीत ती अपयशी ठरली. त्यामुळं लेखी परीक्षेसाठी पात्र नव्हती. पण तिनं आई-वडील आणि नातेवाईकांना गेल्या वर्षीच नोकरी मिळाली, असं सांगितलं. तांत्रिक अडचणींमुळं पगार मिळत नसून, लवकरच तोही मिळेल, असं तिनं सांगितलं होतं,” अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या एसपी शेख सलिमा यांनी बीबीसीबरोबर बोलताना दिली.
ड्रेस कोडची माहिती मिळवली
मालविका वर्षभरापासून तोतया पोलीस अधिकारी बनून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांच्या मते, तिनं रेल्वे सुरक्षा दलात एसआयच्या ड्रेस कोडबाबत आणि पोलिसाच्या गणवेशात नेमके काय असले, याबाबत सर्व माहिती मिळवली.
हैदराबादच्या एलबी नगरमध्ये तिनं आरपीएफचा गणवेश शिवून घेतला. सिकंदराबादमध्ये आरपीएफचा लोगो, स्टार, शोल्डर बॅज, बेल्ट आणि बुटांची खरेदी केली. त्यानंतर तिनं एक बनावट ओळखपत्रही तयार केलं. विशाखा डिव्हिजनमध्ये खरी नोकरी लागल्यासारखी तयारी तिनं केली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मालविका एका वर्षापासून नालगोंडा-सिकंदराबाद मार्गावर तोतया एसआय (सब इन्सपेक्टर) बनून प्रवास करत होती. तिनं 3 जानेवारी 2019 ला बनावट ओळखपत्र तयार करून घेतलं होतं. त्यावर जे मालविका, सब-इन्स्पेक्टर लिहिलं होतं. MR5732019 असा युनिक नंबर असलेलं हे आयडीकार्ड होतं. त्याच्या मागच्या बाजुला ब्लड ग्रुप आणि पत्ता लिहिलेला आहे.
महिलादिनी सन्मानही झाला…

मालविकानं 8 मार्चला नालगोंडामधील एमईएफ संस्थेद्वारे आयोजित महिला दिनाच्या सोहळ्यातही सहभाग घेतला होता. त्या सोहळ्यातही ती पोलिसांच्या गणवेशातच सहभागी झाली होती. संस्थेच्या सदस्यांकडून तिचा सन्मान करण्यात आला होता.
“एक महिला काही तरी मिळवण्यासाठी घरातून निघते. माझी पत्नी हे करेल… माझी मुलगी हे करेल… असा विश्वासानं पाठवा…त्यांना स्वातंत्र्य द्या… त्यांना समाजात पुढं जाऊ द्या,” असा उपदेश तिनं व्याख्यान करताना दिला होता. अटकेनंतर तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.



