महाराष्ट्र
२ अनुकंपा धारकांना “ऑन द स्पॉट” मान्यता
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने समस्या निवारण सभा

नागपूर, प्रतिनिधी :-
शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते. मात्र, शाळेकडून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते. यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे. याचा आज प्रत्यय आला आणि आज पार पडलेल्या सभेत २ अनुकंपा, १ निवड श्रेणी, १ मुख्याध्यापक, १ ग्रंथपाल नियुक्तीस “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले. यासह अन्य प्रकरणे बैठकीत निकाली काढण्यात आल्याने शिक्षकांकडून आमदार सुधाकर अडबाले यांचे कौतुक करण्यात येत आहे.
‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी नागपूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.), पे युनिट अधीक्षक (माध्य.), लेखाधिकारी यांच्यासोबत समस्या निवारण सभा प्रोव्हिडन्स प्रायमरी स्कूल नागपूर येथे घेतली. ही सभा सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत सहा तास चालली.
सभेत मोहन करडभाजने यास सुहास विद्यालय वाई येथे प्रयोगशाळा परिचर सेवक, कृणाल बोपचे यांना न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्यू. कॉलेज महाल नागपूर येथे प्रयोगशाळा सहायक सेवक पदास, शैलेश येडके (सहा. शिक्षक, समर्थ हायस्कूल, रामटेक) यांना निवड श्रेणी, सरस्वती विद्यालय येथील चाफले सर यांना मुख्याध्यापक, झाडे मॅडम यांना ग्रंथपाल पदास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील संच मान्यता दुरुस्तीबाबत झालेल्या कॅम्पची सविस्तर माहिती घेण्यात आली. यात ४९ प्रकरणापैकी फक्त १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात परत एक दिवस कॅम्प घेण्याबाबत वरिष्ठांना पत्र पाठवावे, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.




