गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून कठोर कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोलीस मदत केंद्र, मालेवाडा हद्दीतील मौजा हुर्यालदंड येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित कृष्णा हरसिंग बोगा (वय 41 वर्षे, रा. हुर्यालदंड, ता. कुरखेडा) यांच्या घराच्या सान्दवाडीत तपासणी केली असता अवैधरित्या लागवड केलेला गांजा आढळून आला. पंचासमक्ष करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कॅनबिस वनस्पतींपासून तयार होणारा एकूण 239.66 किलो गांजा असा 1,19,83,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीने विक्रीसाठी स्वत:च्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन पुराडा येथे अप. क्र. 111/2025 अन्वये कलम 8(सी), 20(बी), 20(बी)(त्त)(सी), एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेला अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास पोमके मालेवाडा येथील पोउपनि. आकाश नायकवाडी करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनी समाधान दौंड, पोअं/रोहित गोंगले, पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे, चापोअं/गणेश वाकडोतपवार, पोहवा/संतोष नादरगे, पोअं/नितेश सारवे यांचे विशेष योगदान राहिले.
Back to top button