महाराष्ट्र

गडचिरोली येथील सौ. किरण महादेव चौधरींना दर्पण राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान

गडचिरोली, प्रतिनिधी :–

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली होती. या यादीत नवेगाव कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथील सौ. किरण महादेव चौधरी यांची निवड करण्यात आली.

दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात सौ. किरण महादेव चौधरी यांना “दर्पण राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार – २०२५” सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

या प्रसंगी सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलक्या, अजित चव्हाण, अनिल नहार, दिनेश भोईर तसेच संघाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच गृहिणी असूनही विविध क्षेत्रात सक्रिय कार्य यासाठी सौ. चौधरी यांचा विशेष गौरव करण्यात आला. साहित्य क्षेत्रात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या असून सामाजिक उपक्रमांतही मोलाचे योगदान दिले आहे.

याआधीही त्यांच्या नावे ज्ञानसिंधू स्वयंसिद्धा महिला पुरस्कार, राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार (मुंबई), झाडीबोली महिला रत्न पुरस्कार, रणरागिणी पुरस्कार, साहित्य भूषण पुरस्कार, दै. देशोन्नती उत्कृष्ट कवयित्री पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार असे अनेक सन्मान नोंदवले गेले आहेत. तसेच नागपूर येथे होणाऱ्या कविसंमेलनात त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार दुसऱ्यांदा मिळणार असून पी.पी. म्युझिक तर्फे भारतीय नारीशक्ति पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

सौ. किरण चौधरी यांना हा दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर तसेच स्नेहीमंडळींनी त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव केला.

या गौरवाबद्दल सौ. चौधरी यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे मनःपूर्वक आभार मानले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker